नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२३ मे २६ शनिवार
सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली असून आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा थेट फटका भारतीय ग्राहकांना बसला आहे.आज दि.२३ मे शनिवार पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली.आज पेट्रोल ८७ पैशांनी तर डिझेल ९१ पैशांनी महागले आहे.विशेष म्हणजे गेल्या अवघ्या १० दिवसांतील ही तिसरी मोठी दरवाढ आहे.तर दुसरीकडे दिल्ली-एनसीआरमध्ये कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) च्या दरात प्रति किलो १ रुपयाने वाढ करण्यात आली असून गेल्या १० दिवसांतील ही तिसरी दरवाढ आहे.या ताज्या दरवाढीनंतर दिल्लीत सीएनजीचा दर ८१.०९ रुपये प्रति किलो करण्यात आला आहे.
दरम्यान या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून पर्यायाने सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या आणखी एका धक्क्याला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहे.
याआधी १६ मे रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थेट ३ रुपयांची मोठी वाढ केली होती.त्यानंतर १९ मे रोजी सर्व प्रमुख महानगरांमध्ये पुन्हा ९० पैशांची दरवाढ झाली व आज (शनिवारी) झालेल्या ताज्या वाढीसह गेल्या १० दिवसांत पेट्रोल आणि डिझेल तब्बल ५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.पश्चिम आशियातील युद्धाच्या परिस्थितीमुळे देशात इंधनाचा तुटवडा निर्माण होणार अशी भीती आणि अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरत आहेत.या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम आणि
नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्टीकरण जारी केले असून देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध असून पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे.तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये आणि आवश्यकते नुसारच इंधन खरेदी करावे.काही पेट्रोल पंपांवर निर्माण झालेला तात्पुरता ताण दूर करण्यासाठी तेल कंपन्यांकडून सतत देखरेख आणि समन्वय सुरू आहे.यात काही शहरांतील पेट्रोल-डिझेलचे नवे दर (प्रति लीटर) पुढीलप्रमाणे आहेत.
शहर पेट्रो लचे नवे दर (बदल) डिझेलचे नवे दर (बदल)
मुंबई ₹ १०७.५६ (+०.८७) ₹ ९४.०५ (+०.९१)
दिल्ली ₹ ९९.५१ (+०.८७) ₹ ९२.४९ (+०.९१)
कोलकाता ₹ ११०.५७ (+०.८७) ₹ ९६.०४ (+०.९१)
चेन्नई ₹ १०४.५४ (+०.८७) ₹ ९६.१६ (+०.९१)
गुरुग्राम ₹ १००.३८ (+०.८७) ₹ ९२.९२ (+०.९१)
नोएडा ₹ ९८.७८ (+०.८७) ₹ ९३.१२ (+०.९१) याप्रमाणे करण्यात आलेली आहे.
दरम्यान इंधनाच्या दरात सातत्याने होणाऱ्या या वाढीमुळे नोकरदार वर्ग,वाहतूकदार आणि व्यापारी क्षेत्रावर मोठा आर्थिक ताण येणार असून आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत भाजीपाला,दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढू शकतात व त्यामुळे महागाईचा आलेख आणखी वर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.