मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
“महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार असेपर्यंत दुप्पट वेगाने राज्याला मागे ओढले जात आहे”अशी टीका काँग्रेसचे सचिन सावंत यांनी शनिवारी टि्वटरच्या माध्यमातून केली आहे.वेदान्त फॉक्सकॉन,एअरबस प्रकल्प,बल्क ड्रग पार्क राज्याबाहेर गेल्याची उदाहरणे ताजी असतानाच त्यात आता आणखी एक भर पडली आहे.ऊर्जा उपकरण निर्मिती झोन मध्य प्रदेशमध्ये गेल्याचे वृत्त नुकतेच समोर आले यावरून शनिवारी पुन्हा एकदा शिंदे सरकावर टीकेची झोड उठविण्यात आली यावर राज्य सरकारनेही सारवासारव सुरू केली आहे.दुसरीकडे काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टि्वटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा हल्लाबोल केला.‘भारतीय जनता पक्षाच्या अधिपत्याखाली शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाराष्ट्राबाहेर अनेक प्रकल्प गेले बहुतांश प्रकल्प हे गुजरातमध्ये गेले.आधी वेदान्त प्रकल्प गेला, एअरबस प्रकल्प गेला,आता ऊर्जा निर्मिती प्रकल्पदेखील इतर राज्यात गेला.मी आधीही म्हणालो आहे,आता पुन्हा सांगतो.भाजप राज्याच्या सत्तेवर असेपर्यंत महाराष्ट्राची पीछेहाट होत राहील.हे भाजपचे डबल इंजिनचे सरकार दुप्पट वेगाने राज्याला मागे ओढत आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली.
राज्यातील मोठ्या गुंतवणुकीचे एकेक प्रकल्प शेजारच्या राज्यात जात आहेत हे प्रकल्प महाराष्ट्रात ठेवण्याच्या दृष्टीने शिंदे-फडणवीस सरकार अपयशी ठरले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी केला.पोकळ घोषणा करण्यापलीकडे शिंदे-फडणवीस सरकारला काहीच करता येत नाही अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.राज्यात नवीन रोजगार कसा निर्माण करणार?याचे उत्तर मुख्यमंत्री अथवा उद्योगमंत्र्यांकडे सध्या तरी नाही.नवीन प्रकल्प राज्याबाहेर का जात आहेत?याचे उत्तर सरकारने नागरिकांना द्यायला हवे अशी मागणीही त्यांनी केली आहे.