Just another WordPress site

यावल तालुक्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ उकलले !! अपघाताचा बनाव करून खून !! तिघे संयशीत अटकेत !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२१ जून २६ रविवार

यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील २६ वर्षीय तरुण पवन रविंद्र साळुंखे यांच्या मृत्यू प्रकरणाचा उलगडा करण्यात यावल पोलिसांना यश आले आहे. सुरुवातीला अपघात असल्याचा भास निर्माण करण्यात आला होता मात्र पोलिसांच्या सखोल तपासातून हा अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाले आहे.या प्रकरणी तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ जून २०२६ रोजी पवन साळुंखे यांचा मोटारसायकल अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालय यावल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र वैद्यकीय तपासणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे आढळून आले.घटनास्थळावरील परिस्थिती रक्ताचे डाग तसेच सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर आढळलेले पुरावे यामुळे पोलिसांना अपघाताबाबत संशय आला.

तपासादरम्यान समोर आलेल्या पुराव्यांनुसार आरोपींनी पवन साळुंखे यांचा खून करून त्यांचा मृतदेह मोटारसायकलजवळ टाकला आणि अपघात झाल्याचा बनाव रचला यामुळे सुरुवातीला हा प्रकार अपघात वाटावा असा प्रयत्न करण्यात आला होता.या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), २३८, २९१(अ),२५४(ब),३४ तसेच अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रतीक पाटील वय ३२ व्यवसाय मजुरी,नितीन कोळी वय ३२ व्यवसाय भाजीपाला विक्री आणि लोकेश दिवाकर महाजन वय ३२,रा. डांगपूर यांना अटक करण्यात आली आहे.न्यायालयाने आरोपींना २५ जून २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई यावल पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अपघाताचा बनाव करून खून लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.