Just another WordPress site

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार रस्सीखेच !!

भाजपाच्या संभाव्य उमेदवार म्हणून डॉ.केतकी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब !! शिवसेना शिंदे गटाचे काय ?

जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२७ मे २६ बुधवार

विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरु असतांना ही जागा शिंदे गटाला मिळावी यासाठी जिल्ह्यातील शिवसेना
आमदारांनी काल दि.२६ मे मंगळवार रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली व जळगावमधून शिवसेनेचाच उमेदवार मैदानात उतरवावा अशी जोरदार मागणी आमदारांनी केली.तर दुसरीकडे शिंदे गटाचे राजकीय डावपेच लक्षात घेऊन भाजपनेही इच्छुकांची संख्या मोठी असली तरी संभाव्य उमेदवाराच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर आली आहे.मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीला जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे,आमदार किशोर पाटील आणि आमदार अमोल पाटील उपस्थित होते.जळगावमधील विधान परिषदेची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी
स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे आणि पक्षाची ताकद यांचा विचार व्हावा अशी भूमिका आमदारांनी मांडल्याचे समजते.शिंदे यांनी देखील जळगावची जागा शिवसेनेला मिळावी ही मागणी नोंदवून घेतल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान राज्यातील विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम असून शिवसेनेच्या शिंदे गटाला एकूण किती जागा दिल्या जाणार ? यावरच जळगावच्या जागेचे भवितव्य अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून या मतदारसंघावर दावा करण्यात येत असल्याने स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.भाजपकडूनही माजी खासदार डॉ.उल्हा स पाटील यांची कन्या डॉ.केतकी पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा असून महिला नेतृत्वाला संधी देण्याच्या दृष्टीने त्यांच्या उमेदवारीचा विचार होऊ शकतो असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.सदरहू शिवसेनेच्या दाव्याला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त असून जागावाटपावरून महायुतीतील समन्वय बिघडण्याची भीतीही व्यक्त होत आहे.महायुतीच्या जागावाटपाबाबत आज बुधवारी दिवसभरात किंवा उद्या गुरुवारी दुपारपर्यंत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे व त्यानंतरच जळगाव मतदारसंघातून नेमका कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार ? हे स्पष्ट होणार आहे.तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे निरीक्षक भास्करराव काळे यांच्या उपस्थितीत उद्या दि.२८ मे गुरुवार रोजी मित्रपक्षांची संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याने त्यानंतरच महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी पहिल्या दोन दिवसांत एकही अर्ज दाखल झालेला नाही.जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत २७ इच्छुकांनी तब्बल ४० उमेदवारी अर्ज घेतले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ जून पर्यंत असून त्यानंतर अर्जांची छाननी आणि माघारीची प्रक्रिया पार पडणार आहे.उमेदवारांना ४ जूनपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत.निवडणूक बिनविरोध न झाल्यास २२ जून रोजी मतदान घेण्यात येईल व त्यानंतर मतमोजणी होईल.जळगावच्या जागेवरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे आगामी काही दिवस जिल्ह्याच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.