Just another WordPress site

“फांदीवर बसलेल्यांनी आव्हानांची भाषा करु नये”-“केसाने गळा कापू नका”, हे भाजपाला म्हणणाऱ्या रामदास कदमांना नारायण राणेंचे उत्तर

रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.९ मार्च २४ शनिवार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागावाटपाचे काय होणार ? हा तिढा अद्याप सुटलेला नसून महाराष्ट्रात ४८ जागा आहेत व या जागांपैकी कोण किती जागा लढवणार ? हे अद्यापही ठरलेले नाही.अशात केसाने गळा कापू नका असे रामदास कदम यांनी म्हणत देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला सुनावले आहे.त्यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनीही भूमिका मांडली आहे.”फांदीवर बसलेल्यांनी आव्हानांची भाषा करु नये” असे नारायण राणेंनी रामदास कदम यांना सुनावले आहे.काही वेळापूर्वी नारायण राणे यांनी एक पोस्ट करत रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे.

महाराष्ट्र भाजपच्या माध्यमातून इथे जे चालले आहे ते अतिशय घृणास्पद चालले आहे.माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की,पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान पकडले पाहिजेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचाच आहे पण तुमच्यावर विश्वास ठेवून जे लोक आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका.मोदी-शाह यांच्याबाबत संबंध वेगळा मेसेज आपण भाजपकडून देत आहात याचे भानदेखील भाजपच्या काही लोकांना असणे अत्यंत आवश्यक आहे असे रामदास कदम म्हणाले होते.आता नारायण राणेंनी यावर उत्तर दिले आहे. आमचे मित्रपक्ष व सहकारी यांच्या गळ्यात हार पडावे,त्यांचा सन्मान व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो.आम्ही केसाने गळा कापत नाही.केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत.आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग ? जनमानसात आपले नाव असले पाहिजे.फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करु नये नाही तर आपल्‍याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्‍हणण्‍याची वेळ येईल असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

रामदास कदम यांना मी बरीच वर्षे ओळखतो अशा प्रकारची वक्तव्य करण्याची त्यांची सवय आहे.टोकाचे बोलण्याची त्यांची सवय आहे.रागानेही ते बोलतात.भाजपाने शिवसेनेचा सन्मानच केला आहे.आम्ही ११५ आहोत तरीही आमच्याबरोबर आलेल्या एकनाथ शिंदेंना आम्ही मुख्यमंत्री केले कारण खरी शिवसेना आमच्याबरोबर आली याचे आम्हाला समाधान आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमचे पूर्ण समर्थन आहे.आमच्याबरोबरची शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष यांना बरोबर घेऊनच आम्ही पुढे जात आहोत.आम्ही सगळ्यांचा योग्य सन्मान ठेवू.आता ठीक आहे अनेक लोक लक्ष वेधून घेण्यासाठी बोलतात.आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी त्या गांभीर्याने घेऊ नये असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदमांना उत्तर दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.