सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१६ मार्च २४ शनिवार

सांगोला तालुक्यातील शिरभावी गावच्या शिवारात वन विभागाच्या परिसरात एका वृद्ध महिलेच्या हत्येचा छडा लावण्यास सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले असून मृत वृद्ध महिला जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून सख्ख्या भाच्यानेच तिचा निर्घृणपणे खून केल्याचे तपासात आढळून आले आहे.द्वारकाबाई बबन माने रा.धायटी,ता. सांगोला असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव असून या खुनाच्या आरोपाखाली तिचा सख्खा भाचा विजय दत्ता खेडकर वय ४२,रा.धायटी यास पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती शी की, द्वारकाबाई माने हिचा मृतदेह शिरभावी गावच्या शिवारात वन विभागाच्या परिसरात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला होता.सदरहू सदरील महिलेचा चाकूने भोसकून आणि डोके ठेचून तिचा खून झाल्याचे दिसून आल्यानंतर मृताची ओळख पटविण्यात आली.मृत द्वारकाबाई ही धायटी गावात दोन मुलांसह राहात होती.ती आपल्याच गावात राहणाऱ्या सख्ख्या भावाला भेटण्यासाठी गेली होती परंतु नंतर ती घरी परतली नाही.उलट तिचा शिरभावी परिसरात खून झाल्यामुळे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्याकडे सोपविला होता.त्यांच्याच अधिपत्याखालील सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व फौजदार सूरज निंबाळकर यांच्या पथकाने केलेल्या चौकशीत मृत द्वारकाबाईंच्या नातेवाईकांचे वर्तन संशयास्पद असल्याचे दिसून आले.त्यांचा भाचा विजय खेडेकर हा गुन्हा उजेडात आल्यापासून बेपत्ता होता त्यास अक्कलकोटमध्ये ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.आपली आत्या द्वारकाबाई ही आपल्या कुटुंबीयांवर जादूटोणा करीत असल्याचा संशय होता त्यातूनच रागाच्या भरात आत्या द्वारकाबाईचा आपण खून केल्याची विजय खेडेकर याने कबुली दिल्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सांगितले आहे.