Just another WordPress site

यावल नगराध्यक्षांच्या निर्णयामुळे क्रिडांगणाचा मार्ग मोकळा !! भुमी अभिलेखकडून मोजमाप सुरू !! शहरातील खेळाडूंची दीर्घकाळापासुनची प्रतीक्षा संपणार !!

यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१७ मे २६ रविवार

शहरातील व परिसरातील खेळाडू व युवकांची अनेक वर्षांची मागणी असलेल्या नगरपरिषद क्रीडांगणाच्या विकासाचा मार्ग अखेर मोकळा होताना दिसत आहे.सातोद रस्त्यावरील नगरपरिषदेच्या नियोजित क्रीडांगणाच्या जागेचे शुक्रवारी भूमी अभिलेख विभागाकडून अधिकृत मोजमाप करण्यात आले.मोजणी शीट प्राप्त झाल्यानंतर जागा नगरपरिषदेच्या ताब्यात येणार असून त्यानंतर क्रीडांगण विकसित करण्याच्या कामाला वेग दिला जाणार आहे.

दरम्यान शहरात स्वतंत्र व सुसज्ज क्रीडांगणाची मोठी आवश्यकता असून अनेक वर्षांपासून खेळाडूंना सरावासाठी योग्य सुविधा उपलब्ध नव्हत्या व ही गरज ओळखून नगराध्यक्ष छाया पाटील यांनी क्रीडांगणाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचा निर्णय घेतल्याने खेळाडूंमध्ये समाधान व्यक्त होत आहे.शहरातील सातोद रस्त्यावरील शेत गट क्रमांक ३७,सिटी सर्वे क्रमांक ३८३५ मधील ०.५१ आर जागा क्रीडांगणासाठी आरक्षित करण्यात आली होती. संबंधित शेतमालकाला जागेचा मोबदला देण्यात आला असला तरी जागा अद्याप नगरपरिषदेच्या ताब्यात आली नव्हती.आता नगरपरिषदेने आवश्यक शुल्क भरल्यानंतर भूमी अभिलेख विभागाने प्रत्यक्ष मोजणीची प्रक्रियेला सुरू करण्यात आली आहे.

या प्रसंगी नगराध्यक्ष छाया पाटील,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील,शिक्षण समितीचे सभापती पराग सराफ,नगरसेवक निसार मोमीन,उमर कच्छी,काँग्रेस शहराध्यक्ष हाजी हकीम शेख, मजहर शेख,शिवसेना उबाठाचे नगरपालिका गटनेता सागर चौधरी आदी उपस्थित होते.दरम्यान क्रीडांगणाच्या जागेची स्वच्छता मोहीमही नगरपरिषदेच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. जेसीबीच्या साह्याने परिसर समतल करण्याचे काम सुरू असून मोजणी पूर्ण झाल्यानंतर खुणा गाडून जागा अधिकृतरित्या नगरपरिषदेच्या ताब्यात दिली जाणार आहे व त्यानंतर शहरातील खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडांगण विकासाचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.