माळेगाव पोलिसांचा धडाका !! सराईत गुन्हेगाराकडून दोन पिस्तुले,रायफलसह शस्त्रसाठा जप्त !!
सांगवी येथील सराईत आरोपीवर शस्त्रसाठा प्रकरणी २६ गुन्ह्यांची नोंद !!
सनी पटेल,पोलीस नायक
पुणे विभागीय प्रमुख
दि.१६ जून २६ मंगळवार
माळेगाव पोलिसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तुले,एक रायफल,दोन जिवंत काडतुसे व काडतुसांच्या दोन पुंगळ्या जप्त केल्या आहेत.या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,माळेगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की,सांगवी ता.बारामती येथील अक्षय कल्याण तावरे वय ३५ हा गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगून फिरत आहे.या माहितीच्या आधारे पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तात्काळ सापळा रचला.सांगवी गावात संशयिताचा शोध घेत असताना तो एका हॉटेलसमोर बसलेला आढळून आला.पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेत झडती घेतली असता त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुले,दोन जिवंत काडतुसे आणि वापरलेल्या काडतुसांच्या दोन पुंगळ्या आढळून आल्या.
यानंतर आरोपीच्या राहत्या घरी झडती घेतली असता एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये लपवून ठेवलेली रायफलही जप्त करण्यात आली.चौकशीदरम्यान आरोपीने ही शस्त्रे मध्यप्रदेशातून आणल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.आरोपी अक्षय तावरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे ग्रामीण,सातारा व सोलापूर जिल्ह्यांत मालमत्तेविरुद्ध आणि व्यक्तीविरुद्धचे तब्बल २६ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ,पोलिस उपनिरीक्षक डी.आर.साळवे,तुषार भोरे,पोलिस हवालदार विजय वाघमोडे,राहुल पांढरे तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.