यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ जून २५ सोमवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील गायरान शिवारात काही दिवसांपूर्वी मादी बिबट आणि त्यांचे दोन पिल्लू शेतकऱ्यांना दिसून आले होते परिणामी या भागात मादी बिबट तिच्या पिल्लासह वावरत असल्याचे निष्पन्न झाले होते.
दरम्यान काल रविवार रोजी सायंकाळी गायरान भागातील सांगवी बु ॥ ग्रामपंचायतीच्या केळीच्या शेतीत सुमारे साडे तीन महिने वयोगटातील बिबटचे पिल्लू मयत अवस्थेत सचिन दत्तू बावस्कर या शेतकऱ्याला दिसून आले.याबाबतच्या घटनेची माहिती वन विभागास सुत्रांकडून मिळाल्याने संबधीतांनी तातडीने वनविभागाला दिली.सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील,यावल प्रादेशिक वनविभाग पुर्व क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे,मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक,वनपाल आय.एस.तडवी सह पथक शेतात दाखल झाले.सदर मृत बिबट्याच्या पिल्लाचा पंचनामा करून मयत बिबटचे पिल्लू यावल येथे आणण्यात आले.सदर बिबटच्या पिल्लूवर आज सोमवारी शवविच्छेदन केले जाणार आहे अशी माहिती यावल पुर्व क्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी स्वप्निल फटांगरे यांनी दिली आहे.सदरील बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे कि अन्य कोणत्या कारणामुळे याबाबत अजून माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.