बारामती RTO पुन्हा चर्चेत !! परवाना प्रक्रियेवर नागरिकांकडून गंभीर प्रश्न !! काही अर्जदारांना प्रत्यक्ष ट्रायल न देता परवाना मिळाल्याचे नागरिकांचे म्हणणे !! काही अधिकाऱ्यांकडून सह्या होण्याच्या प्रक्रियेबाबतही चर्चेला उधाण !!
सनी पटेल,पोलीस नायक
बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.०९ मार्च २६ सोमवार
बारामती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) येथे परवाना प्रक्रियेबाबत काही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी नियमांनुसार अर्जदाराला वाहन चालवण्याची प्रत्यक्ष चाचणी (ट्रायल) द्यावी लागते मात्र काही अर्जदारांना प्रत्यक्ष ट्रायल न देता परवाना मिळाल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक पातळीवर बोलले जात असलेल्या माहितीनुसार,काही अर्जदार एजंटांच्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण करत असल्याचे दिसून येत असल्याचे काही लोक सांगत आहेत. यामध्ये कागदपत्रांची पूर्तता,अर्ज सादर करणे आणि पुढील टप्प्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एजंटांचा वापर केला जात असल्याची चर्चा परिसरात ऐकू येत आहे.
तसेच काही प्रक्रियांमध्ये संबंधित कागदपत्रांवर अधिकाऱ्यांच्या सह्या होण्याच्या पद्धतीबाबतही काही नागरिकांकडून शंका व्यक्त केल्या जात असल्याचे समोर येत आहे. काही अर्जदारांचे म्हणणे आहे की,सर्व नियमांची पूर्ण पडताळणी न करता काही फाईल्स पुढे जात असल्याची चर्चा आहे.तथापि याबाबत अधिकृत स्तरावर कोणतीही पुष्टी झालेली नाही.
नियमांनुसार वाहनचालक परवाना देण्यापूर्वी अर्जदाराची वाहन चालवण्याची क्षमता तपासणे,वाहतूक नियमांची माहिती असणे आणि प्रत्यक्ष ट्रायलमध्ये समाधानकारक कामगिरी करणे आवश्यक असते त्यामुळे अशा प्रकारच्या चर्चांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून येते.
दरम्यान या संदर्भात संबंधित विभागाने सर्व प्रक्रियांची पारदर्शकता अधिक बळकट करावी तसेच परवाना प्रक्रियेबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती द्यावी अशी अपेक्षा काही नागरिक व्यक्त करत आहेत.योग्य चौकशी झाल्यास वस्तुस्थिती समोर येईल आणि नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल असे मतही काही जणांनी व्यक्त केले आहे.
सध्या या विषयावर विविध स्तरांवर चर्चा सुरू असून संबंधित विभागाकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळाल्यानंतरच नेमकी परिस्थिती स्पष्ट होऊ शकते.