Just another WordPress site

माळेगाव पोलिसांची दमदार कारवाई !! गावठी पिस्टल,जिवंत काडतूस व धारदार कुकरीसह दोघांना अटक !!

सनी पटेल,पोलीस नायक

बारामती  जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.०९ जून २६ मंगळवार

माळेगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अवैध शस्त्रांविरोधात मोठी कारवाई करत एका तरुणाकडून गावठी पिस्टल,जिवंत काडतूस आणि धारदार कुकरी जप्त केली आहे.या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईमुळे परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हावागज येथे गणेश तात्याराम गावडे (वय २०) हा तरुण गावठी पिस्टल जवळ बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांना मिळाली होती.या माहितीची खातरजमा करून तातडीने गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार दि.८ जून २६ रोजी रात्री पोलिसांनी कऱ्हावागज परिसरातील तुकाई चौक येथे सापळा रचला.या वेळी MH-42-AX-4428 क्रमांकाची कार संशयास्पदरीत्या उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.वाहनाजवळ जाऊन चौकशी केली असता त्यामधील तरुणाने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला ताब्यात घेतले.त्यानंतर त्याची व वाहनाची झडती घेण्यात आली.झडतीदरम्यान आरोपीच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल,एक जिवंत 7.65 केएफ काडतूस आणि एक धारदार कुकरी जप्त करण्यात आली. तसेच आरोपी वापरत असलेली कारही पोलिसांनी जप्त केली.जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे ३० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल,३००० रुपये किमतीचे जिवंत काडतूस,५०० रुपये किमतीची कुकरी आणि सुमारे ३ लाख रुपये किमतीची कार असा एकूण ३ लाख ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपी गणेश गावडे याने सदर गावठी पिस्टल मयुर विष्णू मोरे रा.मेडद,ता.बारामती याच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मयुर मोरे यालाही ताब्यात घेतले.दोघांविरुद्ध माळेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 150/2026 दाखल करण्यात आला आहे.आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ३,४,५,२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.गावठी पिस्टल खरेदी करण्यामागचा नेमका उद्देश काय होता तसेच हे शस्त्र आरोपींनी कोणाकडून मिळवले व त्याचा वापर कशासाठी केला जाणार होता याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी कुलदीप संकपाळ,पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे,पोलीस हवालदार राहुल पांडरे,विजय वाघमोडे, पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप,पोलीस कॉन्स्टेबल अमोल राऊत,ज्ञानेश्वर मोरे,अनिल वाघमारे व जयसिंग कचरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात माळेगाव पोलिसांनी उचललेल्या या धडक पावलाचे परिसरातून स्वागत होत असून अशा कारवायांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसण्यास मदत होणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.