सनी पटेल,पोलीस नायक
पुणे विभागीय प्रमुख :-
दि.०१ जून २६ सोमवार
बारामती तालुक्यातील निरावागज परिसरात अवैध दारू निर्मिती आणि विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये जोर धरत आहे. परिसरातील विविध ठिकाणी हातभट्ट्यांद्वारे अवैध दारूची निर्मिती होत असल्याचे सांगितले जात असतांना संबंधित यंत्रणा मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार,निरावागज परिसरातील काही भागांमध्ये दिवस-रात्र अवैध दारूचे अड्डे सुरू आहेत.हातभट्ट्यांमधून मोठ्या प्रमाणात दारू तयार करून ती परिसरातील विविध भागात पोहोचवली जात असल्याची चर्चा आहे.एवढे सर्व सुरू असतांना पोलीस प्रशासनाला याची माहिती नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल त्यामुळे “पोलीसांना माहिती असूनही कारवाई का होत नाही?” हा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.अवैध दारू व्यवसायामुळे परिसरातील अनेक युवक व्यसनाच्या आहारी जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.शाळा,महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणांच्या आसपासही दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत व यामुळे तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात येत असल्याची चिंता पालक व्यक्त करत आहेत.शासन एकीकडे व्यसनमुक्ती अभियान राबवत असतांना दुसरीकडे अशा अवैध व्यवसायांना मोकळे रान मिळत असल्याचे दिसत आहे.
विशेष म्हणजे हातभट्ट्या उभारण्यासाठी लागणारे साहित्य,दारू निर्मितीची प्रक्रिया,वाहतूक आणि विक्री यासाठी मोठी यंत्रणा कार्यरत असते व त्यामुळे हा व्यवसाय काही तास किंवा काही दिवसांचा नसून दीर्घकाळ सुरू असल्याचा आरोप होत आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला व्यवसाय संबंधित यंत्रणांच्या नजरेतून कसा सुटतो ? हा सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा प्रश्न आहे.निरावागज परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की,अनेक वेळा तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होताना दिसत नाही. छापेमारीची माहिती मिळाली की संबंधित आरोपी आधीच सावध होतात आणि काही दिवस व्यवसाय बंद ठेवून पुन्हा सुरू करतात अशी चर्चा आहे व त्यामुळे कारवाईची गोपनीयता आणि प्रभावीपणा यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
अवैध दारू व्यवसायामुळे केवळ कायदा-सुव्यवस्थेचाच प्रश्न निर्माण होत नाही तर अनेकदा विषारी दारूमुळे नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होतो.राज्यातील विविध भागांमध्ये विषारी दारूमुळे अनेकांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत व त्यामुळे निरावागज परिसरातही अशी एखादी दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने जागे होणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.परिसरातील महिलांमध्येही संतापाचे वातावरण आहे.दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होत आहे.घरगुती कलह,भांडणे,गुन्हेगारी आणि सामाजिक अस्वस्थता वाढण्यामागे अवैध दारू व्यवसाय मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे मात्र या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप होत आहे.
नागरिकांनी आता थेट पोलीस प्रशासनालाच जाब विचारण्यास सुरुवात केली आहे.”अवैध हातभट्ट्या सुरू आहेत हे सर्वसामान्य नागरिकांना दिसते मग संबंधित अधिकाऱ्यांना का दिसत नाही ?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.काही नागरिक तर उघडपणे असेही म्हणत आहेत की,जर कठोर कारवाई झाली असती तर हा व्यवसाय इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलाच नसता.निरावागज परिसरात सुरू असलेल्या या कथित अवैध व्यवसायाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.तसेच या व्यवसायाला कोणाचे संरक्षण मिळत आहे का ? याचाही शोध घेण्याची मागणी होत आहे.जर प्रशासनाने याकडे वेळेत लक्ष दिले नाही तर नागरिकांचा कायद्यावरील विश्वास आणखी कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.