Just another WordPress site

तीनहत्ती चौकात वाहतुकीचा बोजवारा !! राँग साईड व रस्त्यावर उभी वाहने आणि ट्रॅफिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण !!

सनी पटेल,पोलीस नायक

बारामती-जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.१६ मार्च २६ सोमवार

शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि कायम वर्दळीचा म्हणून ओळखला जाणारा तीनहत्ती चौक परिसर सध्या वाहतूक कोंडी आणि नियमभंगामुळे चर्चेत आला आहे.विशेषतः पूनावाला उद्यान समोरील रस्त्यावर काही वाहनचालक सर्रास चुकीच्या दिशेने वाहने चालवत आहेत तर अनेक जण आपली वाहने थेट रस्त्यावर उभी करून निघून जात असल्यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण होत आहे.परिणामी रोजच्या रोज वाहतुकीचा बोजवारा उडत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.तीनहत्ती चौक हा बारामतीतील प्रमुख मार्गांपैकी एक मानला जातो.या चौकातून दररोज शेकडो दुचाकी,चारचाकी तसेच जड वाहनांची सतत ये-जा सुरू असते.शहरातील विविध भागांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे येथे दिवसभर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते.मात्र काही बेजबाबदार वाहनचालक वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.विशेषतः पूनावाला उद्यान समोरील रस्त्यावर अनेक वाहनचालक राँग साईडने थेट समोरून येताना दिसतात. यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक मारावे लागतात.अनेक वेळा वाहनचालकांमध्ये वाद होण्याचे प्रकारही घडतात.काही वेळा किरकोळ धडकाही होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या सर्व प्रकारांमुळे येथे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

याशिवाय या परिसरात आणखी एक गंभीर समस्या म्हणजे रस्त्यावर उभी केली जाणारी वाहने.अनेक वाहनचालक आपली दुचाकी किंवा चारचाकी थेट रस्त्याच्या कडेला किंवा कधी कधी रस्त्याच्या मध्यभागी उभी करून निघून जातात त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होते आणि वाहतुकीची कोंडी निर्माण होते.विशेषतः गर्दीच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक पोलिसांची उपस्थिती अत्यंत कमी दिसते त्यामुळे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांचे धाडस वाढले आहे.रोजच्या रोज राँग साईडने येणारी वाहने आणि रस्त्यावर उभी केलेली वाहने दिसत असतानाही संबंधित विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.या चौकातून शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी,कामासाठी जाणारे नागरिक तसेच वयोवृद्ध लोक मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात मात्र रस्त्यावर उभी वाहने आणि चुकीच्या दिशेने येणारी वाहने यामुळे पादचारी आणि वाहनचालक दोघांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून जावे लागते अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे.

“रोजच्या रोज वाहतूक नियमांचे उघड उल्लंघन होत असताना ट्रॅफिक पोलिस नेमके काय करत आहेत?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे.दरम्यान स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की,तीनहत्ती चौक परिसरात कायमस्वरूपी ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती करावी,रस्त्यावर उभी असलेली वाहने तात्काळ हटवावीत तसेच राँग साईडने येणाऱ्या वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी.तसेच योग्य दिशादर्शक फलक, बॅरिकेड्स आणि वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था तातडीने करण्यात यावी अशी मागणीही करण्यात येत आहे.बारामती शहरातील इतक्या महत्त्वाच्या चौकात अशी परिस्थिती निर्माण होणे ही प्रशासनासाठी गंभीर बाब मानली जात आहे.तीनहत्ती चौकातील वाहतूक कोंडी,राँग साईडने धावणारी वाहने आणि रस्त्यावर उभी केली जाणारी वाहने यावर तातडीने नियंत्रण आणले नाही तर एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.