बारामती सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात गंभीर अनागोंदी !! रुग्णांच्या जीवाशी सुरू आहे खेळ? !!
डॉक्टरांकडे आय-कार्ड नाही !! नाईट शिफ्टमध्ये झोप तर औषधे-इंजेक्शन बाहेरून आणण्यास भाग पाडल्याची तक्रार !!
सनी पटेल, पोलीस नायक
बारामती जिल्हा,(प्रतिनिधी) :-
दि.११ मे २६ सोमवार
सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालय बारामती येथील कारभाराबाबत गंभीर तक्रारी समोर येत असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.उपजिल्हा रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेत मूलभूत शिस्त आणि जबाबदारीचा अभाव असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.तक्रारीनुसार, अनेक डॉक्टर आणि कर्मचारी ओळखपत्र (I-Card) न घालता काम करत आहेत त्यामुळे रुग्णांना उपचार करणारी व्यक्ती नेमकी कोण हे ओळखणे कठीण होत आहे.तर नाईट शिफ्टमध्ये काही डॉक्टर आणि परिचारिका झोप घेत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत.आपत्कालीन सेवेसाठी असलेल्या रुग्णालयात अशी निष्काळजीपणा आढळत असल्यास तो अत्यंत गंभीर प्रकार मानला जात आहे.
याशिवाय काही आवश्यक इंजेक्शन आणि औषधे रुग्णांना बाहेरून आणण्यास सांगितले जात असल्याने सरकारी रुग्णालयातील औषधसाठा आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे या सर्व बाबींविषयी संबंधित अधिकारी वर्गाकडे विचारणा केली असता कोणतेही स्पष्ट उत्तर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.प्रशासनाच्या या मौनामुळे संशय अधिक गडद होत असून जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे.रुग्णांच्या जीवाशी संबंधित अशा गंभीर तक्रारींची तातडीने चौकशी करून दोषी डॉक्टर,कर्मचारी आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. चौकशीत तथ्य आढळल्यास संबंधितांवर निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.