Just another WordPress site

माळेगाव कॉलेज परिसरात अमली पदार्थांचा सुळसुळाट !! नागरिक त्रस्त तर पोलिस प्रशासन मात्र सुस्त !!

सनी पटेल,पोलीस नायक

पुणे विभागीय प्रमुख

दि.२८ मे २६ गुरुवार

माळेगाव शहरातील कॉलेज परिसरात दिवसेंदिवस अमली पदार्थांची विक्री वाढत असल्याचे गंभीर चित्र समोर येत असून कॉलेजच्या आजूबाजूला असलेल्या काही टपऱ्या,गल्लीबोळ आणि संशयित ठिकाणांवरून खुलेआम अमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.विशेष म्हणजे हे सर्व प्रकार स्थानिक पोलिस प्रशासनाच्या नजरेआड कसे राहतात ? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी युवा पिढी मोठ्या प्रमाणात या व्यसनाच्या आहारी जाताना दिसत असून अनेक विद्यार्थी शिक्षण सोडून चुकीच्या संगतीत अडकत असल्याची भीती पालक व्यक्त करत आहेत.शहरातील भविष्यातील पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत असतांना पोलिस प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार माळेगाव शहरात काही ठिकाणी दिवसाढवळ्या संशयास्पद हालचाली सुरू असतात.टपऱ्यांवर युवकांची गर्दी,रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या हालचाली आणि संशयित व्यक्तींची ये-जा यामुळे परिसरातील वातावरण दूषित होत चालले आहे.मात्र एवढे सर्व सुरू असतांनाही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.“कॉलेज परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री सुरू असतांना पोलिसांना याची माहिती नाही का ? की सर्व काही माहिती असूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे ?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.काही नागरिकांनी तर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर थेट नाराजी व्यक्त करत “लहानसहान कारवायांमध्ये तत्परता दाखवणारे पोलिस युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अमली पदार्थांच्या विक्रेत्यांवर मात्र का मेहरबान आहेत ?” असा आरोप केला आहे.परिणामी माळेगाव शहरातील पालकांमध्येही मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मुलांना शिक्षणासाठी कॉलेजमध्ये पाठवायचे की नाही ? असा प्रश्न आता पालकांना पडू लागला आहे.कारण शिक्षणाच्या मंदिराभोवतीच नशेचे जाळे पसरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.नागरिकांनी पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन माळेगाव कॉलेज परिसरात विशेष मोहीम राबवावी व संबंधित टपऱ्यांची चौकशी करावी आणि अमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.अन्यथा आगामी काळात युवा पिढी पूर्णपणे व्यसनाच्या आहारी गेल्यास त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.