बारामतीच्या सांगवी परिसरात खुलेआम जुगार,मटका,अवैध दारू व चक्रीचा सुळसुळाट !! पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह !! युवक पिढी व्यसनांच्या विळख्यात !!
सनी पटेल,पोलीस नायक
पुणे विभागीय प्रमुख
दि.२९ मे २६ शुक्रवार
बारामती तालुक्यातील सांगवी परिसरामध्ये सध्या खुलेआम जुगार,मटका,अवैध दारू विक्री आणि चक्रीचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून संपूर्ण परिसरामध्ये भीती,असुरक्षितता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे सांगवी परिसराची ओळख आता गुन्हेगारीच्या सावटाखाली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार,परिसरातील अनेक भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत जुगारांचे फड रंगत असतात व काही ठिकाणी मटक्याचे आकडे खुलेआम फिरवले जात असून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे.यामुळे सर्वसामान्य कुटुंबांतील युवक मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या आणि अवैध मार्गांच्या आहारी जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे सांगवी परिसरामध्ये अवैध दारू विक्री देखील खुलेआम सुरू असल्याचे आरोप होत आहेत.काही ठिकाणी परवानगी शिवाय दारू विक्री सुरू असून रात्री उशिरापर्यंत नशेबाजांचा वावर वाढल्यामुळे महिलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अनेकदा दारूच्या नशेत रस्त्यावर गोंधळ,भांडणे आणि शिवीगाळ करण्याचे प्रकार घडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
त्याचबरोबर ‘चक्री’ नावाने सुरू असलेल्या जुगाराच्या नव्या प्रकाराने देखील परिसरातील तरुणांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केले आहे.कमी वेळेत मोठे पैसे मिळवण्याच्या आमिषाने अनेक युवक या अवैध धंद्यांच्या जाळ्यात अडकत आहेत.काही कुटुंबांमध्ये आर्थिक संकट निर्माण झाले असून घरातील कमावती मंडळी देखील या व्यसनांमध्ये पैसे उधळत असल्याची खंत महिलांनी व्यक्त केली आहे.नागरिकांचा सर्वात मोठा सवाल असा आहे की,एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या या बेकायदेशीर धंद्यांकडे संबंधित प्रशासन आणि पोलिस विभाग दुर्लक्ष का करत आहे ? परिसरात अनेकदा तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढू लागला आहे.काही ठिकाणी “कारवाईपेक्षा संरक्षणच जास्त मिळत आहे का ?” असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगवी परिसरातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी केली असून युवकांचे भविष्य वाचवण्यासाठी कठोर कारवाईची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले आहे.“आज जुगार-मटका सुरू आहे, उद्या मोठ्या गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्या तर जबाबदार कोण ?” असा सवाल देखील उपस्थित करण्यात येत आहे.नागरिकांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की,जर लवकरात लवकर या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई झाली नाही तर सांगवी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडतील.सदरहू परिसर धंदेमुक्त करण्यासाठी एकत्र येऊन लढा उभारण्याचा निर्धार स्थानिकांनी व्यक्त केला आहे.