राजापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
बारसूतील प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू असून या प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे.याविरोधात स्थानिक ग्रामस्थ आंदोलनही करत असून पोलिसांकडून या आंदोलकांविरोधात बळाचा वापर झाल्याचे निदर्शनास आले आहे.दरम्यान आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजापूरमध्ये जात येथील नागरिकांशी संवाद साधला यावेळी बोलतांना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र सोडले आहे.लोकांची डोकी फुटली तरी चालतील,कोकणातील लोक भिकारी झाले तरी चालतील मात्र रिफायनरी झाली पाहिजे अशी शिंदे सरकारची भूमिका आहे.मात्र बारसूमधील लोकांना रिफायनरी नको असेल तर इथे रिफायनरी होता कामा नये जर हुकूमशाहीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केली आहे.
मी मुख्यमंत्री असताना टाटा एअरबस,बल्कड्रग्ज पार्क असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रात आणले होते मात्र हे सर्व प्रकल्प गुजरातला हलवण्यात आले आणि आता वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारण्यात येत आहेत त्यामुळे राख महाराष्ट्राला आणि रांगोळी गुजरातला असे मी होऊ देणार नाही.आपल्याच जनतेला नुकसान पोहोचवून हे सरकार विकास करणार असेल तर असा विकास आम्हाला नको असेही म्हणाले.आज मी कोकणात ‘मन की बात’ करायला आलेलो नाही तर ‘जन की बात’ ऐकायला आलो आहे.शिवसेना ही बारसूतील लोकांच्या पाठिशी असून जर येथील लोकांना रिफायनरी नको असेल तर काहीही झाले तरी इथे रिफायनरी होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनाही लक्ष्य केले असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ३३ देशात गद्दार म्हणून ओळख झाली आहे. आमच्या सरकारमध्ये मंत्री असताना त्यांना महाराष्ट्रातले तीन जिल्हेसुद्धा ओळखत नव्हते अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.