“अबे तू नेमका कुणाचा प्रचार करणार आहे ते ठरव आधी आणि गप राहायला शिक,तृतीयपंथीयांनी तुला तुझी लायकी दाखवली आहेच कशाला वारंवर तोंड काळ करुन घेतोस?” निलेश राणे यांना अमोल मिटकरी यांचे खोचक प्रत्युत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर महायुतीतील अनेक नेत्यांच्या भूमिकांची गुंतागुंत झाली असून एकेकाळी एकमेकांवर जोरदार टीका करणाऱ्या नेत्यांनाही दोन पावले मागे घ्यावी लागत आहेत.ज्या नेत्यांवर खालच्या पातळीची टीका करायचे त्याच नेत्यांशी जुळवून घ्यावे लागत आहे अशी एकंदरीत स्थिती असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार निलेश राणे यांच्यात चांगलीच जुंपली आहे.अमोल मिटकरी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत म्हटले होते की,राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला असला तरी मी भारतीय जनता पार्टीचा प्रचार करणार नाही.या विधानावरून निलेश राणे यांनी खोचक ट्वीट केले.आत्ताच कुठेतरी वाचले.मिटकरी म्हणतो मी भाजपचा प्रचार करणार नाही.अमोल मिटकरी नेमका कोण आहे?आमच्या कोकणात मिटकरीसारख्या लोकांना शिमग्यातला गोमू म्हणतात.काही लोकांना भलताच कॉन्फिडन्स असतो अशी टीका निलेश राणेंनी केली राणेंच्या या टीकेला अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिले आहे.
“अबे तू नेमका कुणाचा प्रचार करणार आहे ते ठरव आधी आणि गप राहायला शिक,तृतीयपंथीयांनी तुला तुझी लायकी दाखवली आहेच कशाला वारंवर तोंड काळ करुन घेतोस?” असे खोचक प्रत्युत्तर अमोल मिटकरींनी दिले आहे.अजित पवार गट सत्तेत सहभागी होऊन दोन आठवडेही उलटले नाहीत तोपर्यंत महायुतीच्या नेत्यांची आपसात जुंपली आहे.‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत अमोल मिटकरी म्हणाले कि,अजित पवार हे माझे नेते आहेत त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतलाय त्याचे मी समर्थन केले आहे मात्र याचा अर्थ असा नाही की मी भारतीय जनता पार्टीचा प्रचारक असेल किंवा भाजपाचे सरकार यावे यासाठी मी प्रयत्न करेन असे कधीही होणार नाही.