मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-उद्धव ठाकरेंशी फारकत घेत एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी केली.बाळासाहेबांचे हिंदूत्वादी विचार आम्ही पुढे घेऊन जात असल्याचे सांगत शिंदेंनी शिवसेनेवर दावा केला.एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार यांनी पाठिंबा दिला.मात्र नवी मुंबईच्या एका माजी नगरसेवकाने शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत.माजी नगरसेवक एम.के मढवी म्हणाले की मागील २ महिन्यांपासून शिंदे गटाकडून माझ्यावर त्यांच्यासोबत येण्यासाठी दबाव टाकला आहे.माझ्यावर तडीपारीची कारवाई करण्याची नोटीस देत कुटुंबापासून दूर करण्याचा डाव आखला आहे.नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी मला शिंदे गटात सहभागी व्हा अन्यथा तुमचा एन्काऊंटर करु अशी धमकी देत १० लाख रुपये देण्याची मागणी केली.या प्रसंगामुळे माझ्यावर मानसिक दडपण आले आहे असे त्यांनी म्हटले आहे.तसेच मला व माझ्या कुटुंबाला धोका आहे.शिंदे गटात सहभागी झाले नाही तर एन्काऊंटर करण्याची धमकी दिलीजात आहे.तसेच माझ्यावर खोटे आरोप आणि खोट्या केसेस करुन तडीपार करण्याचा प्रयत्न सुरु आहे.जर माझ्यावर अशी कारवाई होत असेल तर मी माझे कुटुंब,साडेतीन वर्षाची नात,२ मुले,सुन,पत्नीसह आत्महत्या करु.आमच्या जीवाला कमी जास्त झाले तर त्याला जबाबदार विवेक पानसरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,संदीप नाईक,विजय चौगुले जबाबदार असतील असा इशारा एम.के मढवी यांनी दिला आहे.

सत्तेचा गैरवापर सुरु आहे. गद्दार निघून गेले जे निष्ठावंत आहेत ते आमच्यासोबत राहिले.एम.के मढवी यांनी न ऐकल्याने पोलिसांमार्फत धमकी दिली जाते.एन्काऊंटर केले जाईल ही गंभीर बाब आहे.एका कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ येते.याबाबत मी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पोलीस आयुक्तांशी बोललो आहोत.महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे.प्रत्येक शिवसैनिकाला असाप्रकारे त्रास दिला जात आहे.हे सगळे जनता उघड्या डोळ्याने बघत आहे अशी प्रतिक्रिया खासदार राजन विचारे यांनी दिली आहे.