अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळाची १७ ठिकाणी धडक कारवाई !! अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांमध्ये घबराट !!
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.११ जून २६ गुरुवार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) जळगाव विभागामार्फत जिल्ह्यातील विविध बसस्थानकांच्या २०० मीटर नो-पार्किंग क्षेत्रामध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात नुकतीच विशेष धडक मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत एकाच वेळी १७ बसस्थानक परिसरात कारवाई करण्यात आली.सदर मोहिमे दरम्यान २०० मीटर नो-पार्किंग झोनचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच अवैधरित्या उभ्या असलेल्या वाहनांना परिसरातून हटविण्याची कार्यवाहीही करण्यात आली.
कारवाईचा तपशील
तपासणी करण्यात आलेली बसस्थानके :१७
नो-पार्किंग झोनचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरील दंडात्मक कारवाई :२७
परिसरातून हटविण्यात आलेली वाहने :१०३
एकूण कारवाई केलेली वाहने : १३०
ही मोहीम जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.यामध्ये यंत्र अभियंता (चा) सचिन पवार,सुरक्षा व दक्षता अधिकारी दिपक जाधव,विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा,उपयंत्र अभियंता सुनील भालतीडक,विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी नरेंद्र चित्ते,कामगार अधिकारी प्रविण पाटील,सांख्यिकी अधिकारी पवार,विभागीय अभियंता निलेश पाटील तसेच सर्व आगार व्यवस्थापक आणि संबंधित अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते.या अधिकाऱ्यांची स्वतंत्र पथके तयार करून स्थानिक आगार प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने विभागातील बसस्थानक परिसरात कारवाई करण्यात आली.अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात थांबण्यास मज्जाव करण्यात आला तसेच संबंधित वाहनचालकांना वाहने हटविण्यास भाग पाडण्यात आले.
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांमध्ये घबराट
एसटी महामंडळाच्या या धडक मोहिमेमुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांमध्ये घबराट निर्माण झाली असून अशा वाहतुकीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे.जळगाव,पाळधी,धरणगाव,एरंडोल,पाचोरा,भडगाव,चाळीसगाव,पारोळा,अमळनेर,चोपडा,अडावद,यावल,फैजपूर,सावदा,रावेर,जामनेर आणि भुसावळ या बसस्थानकांच्या परिसरात कारवाई सुरू असल्याने खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याचे चित्र पाहायला मिळाले.एसटी प्रशासनाने भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून प्रवाशांनी अधिकृत व सुरक्षित प्रवासासाठी एसटी सेवेचाच वापर करावा असे आवाहन जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी केले आहे.