“चिनी राष्ट्राध्यक्षांना अहमदाबादेत आणून कितीही ‘झोके’ दिले तरी ‘भाई भाई’ किंवा ‘मैत्री’अशा भाकड कथांवर चीन विश्वास ठेवत नाही”
चीन घुसखोरीवरून शिवसेनेचे (ठाकरे गट) मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात पंतप्रधान मोदी व भाजपावर सडकून टीका
तसेच राहुल गांधी सध्या लेह आणि लडाखच्या दौऱ्यावर आहेत आणि तेथील जनतेने राहुल गांधी यांच्या दौऱ्यास उदंड प्रतिसाद दिला आहे. लडाखच्या सीमेवरून चीन सतत धडका मारीत असून गेल्या पाच-सहा वर्षांत चीनने आपल्या हद्दीत घुसखोरी करून जमीन बळकावली आहे. अनेक ठिकाणी चिनी व हिंदुस्थानी सैनिकांत संघर्ष झाला पण पंतप्रधान मोदी हे सत्य स्वीकारायला तयार नाहीत.लडाखची इंचभरही जमीन गमावलेली नाही असा दावा पंतप्रधान मोदी करतात पण मोदी सपशेल खोटे बोलत आहेत व चीनने आपल्या भूभागावर अतिक्रमण केले असल्याचे सत्य राहुल गांधी यांनी मांडले आहे असे मत ठाकरे गटाने व्यक्त केले आहे.
चीनने हिंदुस्थानी हद्दीत घुसखोरी केली असून गायरान जमिनी चीनने ताब्यात घेतल्या आहेत त्यामुळे इंचभरही जमीन गमावली नाही हा पंतप्रधान मोदींचा दावा खोटा असल्याचे राहुल गांधी यांनी लडाखच्या भूमीवरून स्पष्ट केले आहे.राहुल गांधी यांनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत सत्य मांडल्याने भारतीय जनता पक्षाने टीका सुरू केली आणि पुन्हा एकदा मोदी भक्त भूतकाळातले खड्डे नव्याने उकरू लागले आहेत तसेच भाजपाच्या मते राहुल गांधी हे देशाचा अपमान करीत असून चीनने घुसखोरी केली काय? असा प्रश्न विचारल्याने देशाचा कोणता आणि कसा अपमान झाला? हे भाजपा प्रवक्त्यांना सांगता येईल काय? राहुल गांधी स्वतः मोटरसायकल चालवीत लेहवरून लडाखला गेले.हा रस्ता दुर्गम व धोक्याचा असून राहुल गांधींचे हे साहस एखाद्या वीर जवानाप्रमाणे आहे.तेथून ते पेन्गाँगला पोहोचले व नुबरा,कारगील येथेही गेले हे सर्व करण्यामागे राहुल गांधी यांची देशभक्ती आहे व देशभक्तीचा मक्ता भाजपनेच घेतलेला नाही.त्याचबरोबर सत्य जाणून घेण्याची त्यांची जिज्ञासा आहे.राहुल गांधींवर टीका करतांना भाजपाचे नेते म्हणतात की,‘हिंदी चिनी भाई भाई’ या घोषणा कोणी दिल्या होत्या? नेहरूंच्या काळातच चीनने ४५ हजार चौरस किलोमीटर जमीन घशात घातली.प्रश्न वर्तमानकाळातला आहे आणि भाजपावाले नेहमीप्रमाणे भूतकाळाच्या अंधाऱ्या गुहेत शिरत आहेत.पंतप्रधान मोदींची ५६ इंचाची छाती असतांना चीन आत घुसला आणि त्याने आपल्या अनेक ‘चौक्या ताब्यात घेतल्या असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
ठाकरे गटाने म्हटले आहे की,पूर्व लडाख सीमेवर पेन्गाँग परिसरात ५ मे २०२० रोजी चीन व हिंदुस्थानी लष्करात हिंसक संघर्ष झाला होता त्यात आपल्या २० जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले हे का घडले याचा हिशेब जनता मागत आहे.‘हिंदी चिनी भाई भाई’ला भाजपाचा विरोध तकलादू आहे कारण मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी चीनबरोबरचे संबंध सुधारायला हवेत यावर भर दिला.चीनच्या राष्ट्राध्यक्षांना ते वरचेवर अहमदाबादला बोलावून शेव,ढोकळा,खाकरा यांची मेजवानी देतात.मोदींबरोबर चिनी राष्ट्रपती झोपाळ्यावर बसून मौज करतात.‘हिंदी चिनी भाई भाई’ हा नेहरूंचा संदेश मोदींनी मान्य केल्याचेच हे लक्षण मानायला हवे.चीनने घुसखोरी केली म्हणून हिंदुस्थानी सैन्यास चीनवर सर्जिकल स्ट्राईक करण्याचे आदेश मोदी यांनी दिलेले नाहीत.आपल्या राष्ट्राच्या मानखंडनेची नेमकी जबाबदारी कोणावर येते हे जाणून घ्यायचा लोकशाहीत नागरिकांना अधिकार असतो.देशाच्या सीमांचे रक्षण करणे हे लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचे कामच आहे.सरकारने आपल्या बऱ्यावाईट कृत्यांचा जाब लोकांपुढे दिलाच पाहिजे परंतु जेव्हा सरकार तसे करण्यास नकार देते तेव्हा कोणीतरी ही जबाबदारी पार पाडावी लागते.१९६२ मधल्या आपल्या राष्ट्रीय मानहानीचा गुन्हा कुणाच्या हातून घडला हे जाणून घेण्याचा अधिकार भाजपास आहेच पण मग ५ मे २०२० रोजी मोदी काळात चीन लडाखमधून किती आत आपल्या हद्दीत घुसला आणि त्याने नक्की काय बळकावले?देशाचे संरक्षण खाते तेव्हा काय करीत होते? हे जाणून घेण्याचा अधिकार आपल्या सगळ्यांनादेखील आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.