Just another WordPress site

“…..तर कदाचित मोदी सरकारचे कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत ‘वेड पांघरून पेडगावला जाणे’सुरूच राहिले असते”-सामनातून ठाकरे गटाची टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२६ डिसेंबर २३ मंगळवार

अवघ्या काही महिन्यांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या असून सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागल्याचे दिसून येत आहे. निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून राष्ट्रीय स्तरावर एकीकडे भाजपा मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा निवडणुका लढवण्यासाठी सज्ज झाली असताना दुसरीकडे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतही मोदींसमोर कोण? या प्रश्नावरचा खल अंतिम टप्प्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण दिवसेंदिवस वाढू लागल्याचे दिसत असतांना उद्भवलेल्या एका मुद्द्यामुळे केंद्र सरकार अडचणीत आल्याचे दिसू लागले आहे.या मुद्द्यावर आता ठाकरे गटाकडून भाष्य करण्यात आले असून मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

गेल्या वर्षभरापासून देशभरात विविध प्रकारची आंदोलन झाल्याचे दिसून आले व त्यात दिल्लीत झालेले कुस्तीपटूंचे आंदोलन प्रचंड चर्चेत आले. काही महिने लढा दिल्यानंतर केंद्र सरकारने कुस्तीपटूंना काहीसा दिलासा देत ब्रिजभूषण सिंह यांना कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हायला लावले मात्र नुकत्याच पार पडलेल्या महासंघाच्या निवडणुकांमध्ये ब्रिजभूषण सिंह यांचेच निकटवर्तीय अध्यक्षपदी बसल्यामुळे त्यावर कुस्तीपटूंकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.साक्षी मलिकने थेट कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली.बजरंग पुनियाने पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर त्यांना लिहिलेल्या एका पत्रावर त्याचा पद्म पुरस्कार ठेवला परिणामी कुस्ती महासंघ बरखास्त करण्याचा निर्णय केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला घ्यावा लागला आहे.संजय सिंह हे बृजभूषण यांचे खासमखास तर होतेच शिवाय तेवढेच वादग्रस्त होते.कुस्ती महासंघातील हा बदल न्यायासाठी झगडणाऱ्या कुस्तीपटूंसाठी ‘पंत गेले,राव लढले’ असाच होता मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा वाद महागात पडणार याची जाणीव झाल्यानेच मोदी सरकारला जाग आली आणि राष्ट्रीय कुस्ती महासंघ नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह यांच्यासह बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला हे उघड आहे.लोकसभा निवडणुकीला काही अवधी असता तर कदाचित मोदी सरकारचे कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत ‘वेड पांघरून पेडगावला जाणे’ सुरूच राहिले असते अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.