“गांधीजींना कोणी ओळखत नव्हते,चित्रपट बनला तेव्हा त्यांना जगभरात ओळख मिळाली” !! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधान चर्चेत !!
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ मे २४ बुधवार
महात्मा गांधी यांच्यावर जेव्हा पहिला चित्रपट बनला तेव्हा जगभरात गांधींबाबत कुतूहल निर्माण झाले त्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हते असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.तसेच गांधींचे विचार जगभरात पोहोचवण्यासाठी आपण ७५ वर्षांत काहीही केले नाही असेही ते म्हणाले.त्यांच्या या विधानानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच एबीपी माझाला मुलाखत दिली.या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली.यावेळी बोलतांना ते म्हणाले,महात्मा गांधी एक मोठे व्यक्तिमत्त्व होते.आपण जगभरात त्यांची ओळख निर्माण करायला हवी होती ही आपली जबाबदारी होती मात्र आपण त्यात अपयशी ठरलो. त्यांना कोणी ओळखत नव्हते.ज्यावेळी महात्मा गांधींवर पहिल्यांदा चित्रपट बनला तेव्हा जगभरात गांधी कोण आहे ? याबाबत कुतूहल निर्माण झाले व त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण ७५ वर्षात काहीही केले नाही अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
जगभरात जर मार्टीन ल्यूथर किंग आणि नेन्सन मंडेला यांना ओळखले जाते मात्र गांधी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते.मी संपूर्ण जग फिरलो आहे मात्र गांधींना किंवा गांधींच्या माध्यमातून भारताला जी ओळख मिळायला हवी होती ती मिळाली नाही.आज जगभरातील अनेक समस्यांचे समाधान गांधींच्या विचारात आहे.आपण खूप काही गमावले आहे असेही ते म्हणाले.ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरासंदर्भातील निर्णय दिला त्यानंतर देशात कुठेही हिंसाचाराची घटना घडली नाही सर्वत्र शांतीचे वातावरण होते व ही शांती एकतर्फी नव्हती याचे श्रेय सर्वांनाच जाते.राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला तेव्हा बाबरी मशिदीची लढाई लढणारे इक्बाल अन्सारी तिथे उपस्थित होते हा आपला भारत आहे मात्र आपण त्याचे मार्केटींग करत नाही असेही त्यांनी सांगितले आहे.