दरम्यान विजय मल्या,नीरव मोदी,मेहुल चोक्सी हे २२ हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाला हवे आहेत व गुन्हे दाखल होण्याआधीच ते परदेशात पळून गेले आहेत.आता पाच वर्षे उलटून गेली तरी त्यांना भारतात परत आणण्यात यश आलेले नाही.१३ हजार कोटींच्या बँक घोटाळ्यात हवा असलेला फरारी हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला भारताच्या ताब्यात देण्यास अँटिग्वा अँड बार्बुडा या टिकली एवढ्या देशाने अलीकडेच नकार दिला आहे.मल्या आणि मोदी यांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत.भारतीय तपास यंत्रणा त्यांचा प्रत्यक्षा ताबा घेण्यात का यशस्वी होत नाहीत ? हा चर्चेचा विषय ठरत आहेत.

मल्या,मोदी,चोक्सी घोटाळा काय ?

किंगफिशर एअरलाईन्सच्या नावावर नऊ हजार कोटींच्या बँक कर्ज घोटाळ्यात विजय मल्या याचा संबंध आहे व गुन्हा दाखल होताच तो लंडनला पळून गेला.त्याच्या प्रत्यार्पणाचा आदेश झाला असला तरी त्याचा प्रत्यक्ष ताबा मिळण्यासाठी अजून किती कालावधी लागेल याची तपास यंत्रणांनाही कल्पना नाही.पंजाब नॅशनल बँकेला साडेतेरा हजार कोटींना फसविल्याप्रकरणी हिरे व्यापारी नीरव मोदी याच्यावर गुन्हा दाखल झाला व गुन्ह्याची कुणकुण लागताच तोही लंडनमध्ये पळून गेला.भारतीय तपास यंत्रणेच्या विनंतीवरून २०१९मध्ये मोदीला अटक झाली त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू असून त्याविरुद्ध त्याने अपील केले आहे.नीरव मोदी याचा काका मेहुल चोक्सी याचाही या घोटाळ्यात समावेश आहे व तोही भारतातून पळून गेला मात्र त्याने अँटिग्वा आणि बार्बुडा या देशात आश्रय घेतला.त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू असली तरी अलीकडे त्याचा ताबा देण्यात तेथील न्यायालयाने नकार दिला आहे.