सनी पटेल,पोलीस नायक
बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२० एप्रिल २६ सोमवार
शहरातील तीन हत्ती चौक ते पुनावाला उद्यान या मार्गावर रॉंग साईडने वाहने चालवण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी विशेष मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली होती.मात्र ही कारवाई फक्त दोन ते चार दिवसांपुरतीच मर्यादित राहिल्याचे चित्र दिसत आहे व त्यानंतर पुन्हा परिस्थिती पूर्ववत झाली असून वाहनचालक सर्रासपणे रॉंग साईडने जाताना दिसत आहेत.
या मार्गावर सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते.शाळा,महाविद्यालये,कार्यालये आणि उद्यान परिसरामुळे नागरिकांची वर्दळही मोठी असते व अशा परिस्थितीत रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका अधिक वाढतो.विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचारी यांना याचा मोठा फटका बसत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.स्थानिक नागरिकांच्या मते,“पोलिसांनी कारवाई केली तेव्हा काही दिवस नियम पाळले गेले मात्र पोलिसांची उपस्थिती कमी होताच पुन्हा जुनीच परिस्थिती निर्माण झाली.मग अशी मोहीम केवळ चार दिवसांसाठीच का ? सातत्याने कारवाई का होत नाही ?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वाहतूक तज्ज्ञांच्या मते,अशा ठिकाणी फक्त तात्पुरती कारवाई करून उपयोग नाही.नियमित गस्त,सीसीटीव्ही देखरेख,दंडात्मक कारवाई आणि जनजागृती यांचा एकत्रित वापर केल्यासच शिस्त निर्माण होऊ शकते.अन्यथा नियम मोडणाऱ्यांना कोणतीही भीती उरत नाही.
दरम्यान नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत तीन हत्ती चौक ते पुनावाला उद्यान मार्गावर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवावा
सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ई-चलन प्रणालीद्वारे कारवाई करावी
रॉंग साईडने जाणाऱ्यांवर कठोर दंड लावावा
रस्त्यावर स्पष्ट दिशादर्शक फलक व बॅरिकेड्स उभारावेत
जर प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष दिले नाही तर भविष्यात मोठे अपघात घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.त्यामुळे वाहतूक विभागाने केवळ दिखाऊ कारवाई न करता सातत्यपूर्ण आणि प्रभावी उपाययोजना राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.