भुसावळ-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ एप्रिल २६ बुधवार
भुसावळ शहरात तसेच जळगाव जिल्ह्यात सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत चर्मकार समाज बांधवांनी भुसावळ येथील मुकेश गुंजाळ यांच्याविरोधात वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,मुकेश गुंजाळ हे सोशल मीडियावर सक्रिय असून त्यांच्या आक्षेपार्ह पोस्ट व वक्तव्यांमुळे आमदार समर्थक आणि चर्मकार समाजामध्ये द्वेषाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच समाजाबाबत अवमानकारक भाषा वापरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप समाज बांधवांनी केला आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे की,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे समाजातील प्रत्येक घटकाला समानतेचे स्थान मिळाले असून अशा परिस्थितीत जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.या प्रकारामुळे शहरातील शांतता व सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी व समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी चर्मकार समाज बांधवांनी केली आहे. सदर निवेदनावर समस्त चर्मकार समाज वरणगाव शहर यांची स्वाक्षरी असून निवेदनाची प्रत पोलीस निरीक्षक,वरणगाव पोलीस स्टेशन यांना नुकतीच देण्यात आली आहे.