यावल नगराध्यक्षाच्या प्रयत्नातून हतनुर धरणातील पाणी साठवण तलावात सोडण्यात आल्याने पाणीप्रश्न मिटला !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१४ मे २६ गुरुवार
येथील नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात पावसाळ्यापर्यंत यावल शहरातील नागरिकांना पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध झाला असून काल दि.१३ मे रोजी हतनूर धरणाच्या पाटचारीतून यावल नगरपालिकेच्या साठवण तलावात प्रत्यक्ष पाणी सोडण्यात आले.
दरम्यान यावल शहराला हतनूर धरणाच्या पाटचारीमधून पाणीपुरवठा करण्यात येतो ते पाणी नगरपालिकेच्या साठवण तलावात घेण्यात येते व नंतर ते जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून शहराला जलवाहिनीव्दारे सोडले जाते.मात्र गेल्या काही दिवसांपासून तलावातील जलसाठा कमी झाल्याने व विद्युत वितरण कंपनीमार्फत होणारा वीजपुरवठा उन्हाळ्यामुळे खंडित होत असल्याकारणाने अनियमित पाणी पुरवठा होत होता व त्यावरून आरोप प्रत्यारोप झाले होते.याबाबत पाटबंधारे विभागाने यावल नगरपालिकेसाठी आरक्षित असलेले हक्काचे आवर्तन मिळावे म्हणून नगराध्यक्षा छाया पाटील यांनी नगरपालिकेमार्फत एप्रिल अखेरीस जिल्हाधिकारी यांचेकडे पत्रव्यवहार केला होता व त्याच अनुषंगाने शहरात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून दि.११ मे रोजी पाणीसोडण्याच्या लेखी आदेश संबंधित विभागाला देण्यात आले होते.काल दि.१३ मे रोजी प्रत्यक्ष साठवण तलावात पाणी पोहचविण्यात आले.यावेळी नगराध्यक्षा छाया पाटील,पाणीपुरवठा अभियंता अनुराधा पाटील,कार्यालयीन अधीक्षक कोल्हे,माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील,नगरसेवक पराग सराफ यांचेसह कार्यकर्ते यांनी पाहणी केली.सदरहू पावसाळ्यापर्यंत यावल येथील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असून नागरिकांनी काळजी करू नये व पाण्यात राजकारण करणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया पाटील यांनी केले आहे.