मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०३ डिसेंबर २४ मंगळवार
राज्यात महायुतीला निर्विवाद बहुमत मिळालेले असतांनाही मुख्यमंत्री पदाचे घोंगडे अद्यापही भिजत आहे.सत्तास्थापनेची तारीख ठरलेली असली तरीही मंत्रिमंडळातील खातेवाटपावर चर्चा झालेली नाही.काळजीवाहू मुख्यमंत्री यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व बैठका रद्द होत असल्याने चर्चा पुढे सरकत नसल्याचे म्हटले जात आहे.मात्र यावरून संजय राऊतांना वेगळाच संशय आला आहे.दिल्लीतील महाशक्ती एकनाथ शिंदेंच्या पाठिशी असल्याने एकनाथ शिंदे भाजपाला डोळे वटारून रुसवे फुगवे करू शकत आहेत असे संजय राऊत म्हणाले आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.“काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची काळजी भाजपाला वाटत नाही व अशा परिस्थितीत सरकार स्थापन होणार आहे तो फार मोठा विनोद असणार आहे.हे सरकार लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवत आहेत.ज्यांनी मतदान केले,त्यांचा आपण केलेल्या मतदानावर किंवा निवडून आलेल्या सरकारवर विश्वास नाही.लोक शंका घेत आहेत यावर निवडणूक आयोगाने खुलासा केला पाहिजे.आज मारकडवाडीत १४४ कलम लावलाय.लोकशाही मार्गाने मतदान घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना घरातून बाहेर पडू नका अशा धमक्या दिल्या जात आहेत.अजून राज्यात सरकार यायचेय.त्या मतदारसंघातून भाजपाचा पराभव झालाय पण मतदारांना वाटतेय विजयी उमेदवाराला जी मते मिळाली आहेत ती कमी मते आहेत.जिंकून सुद्धा फेरमतदान घेत आहेत कारण कमी मतदान झाले आहे असे संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होऊ शकतात असे ट्वीट अंजली दमानिया यांनी केले असून याबाबत आज संजय राऊतांना विचारण्यात आले त्यावर संजय राऊत म्हणाले, “या देशातला विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे.महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यामागे जे रुसवे फुगवे सुरू आहेत,मला वाटते दिल्लीतील महाशक्ती कार्यक्रम करत आहे.दिल्लीतील एखाद्या महाशक्तीशिवाय एकनाथ शिंदे अशाप्रकारचे धाडस करू शकत नाही कारण कोणाची हिंमत नाहीय सध्याच्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांविरोधात अशाप्रकारे रुसवे फुगवे करण्याची.”
दिल्लीतील महाशक्ती महाराष्ट्रात खेळ करत आहे !!
“तीन वर्षांपूर्वी ईडी,सीबीआय,दिल्लीतील गृहमंत्रालयाला घाबरून शिवसेना फोडून पळून गेले व त्यांना तीन वर्षांत असे कोणते टॉनिक मिळाले की ते दिल्लीला डोळे दाखवून रुसवे फुगवे करून बसलेत.दिल्लीतील महाशक्ती महाराष्ट्रात हा खेळ करत आहे आणि हा भाजपातील अंतर्गत खेळ आहे” असे सूचक विधानही संजय राऊत यांनी केले आहे.ते पुढे म्हणाले,“एकनाथ शिंदे यांच्या मागे शक्तीमोचक वगैरे कोणी नाहीय.कोणी काही फसले नाहीय.दिल्लीच्या सूचनेनुसार डोंबाऱ्याचा खेळ सुरू आहे. दिल्लीतून डमरू हलतोय.दिल्लीतील महाशक्ती पाठीशी असल्याशिवाय एकनाथ शिंदे असा डाव करू शकत नाहीत” असे संजय राऊत यांनी नमूद केले आहे.