Just another WordPress site

“स्वच्छता नाही तर मतदान नाही” !! ढगाई नगरमधून नगरसेवकांना थेट इशारा !!

कचरा गाडी गायब !! घराघरात कचरा साचून नागरिक हैराण !! नगरसेवकांच्या निष्क्रियतेवर संताप !!

सनी पटेल,पोलीस नायक

बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.०५ एप्रिल २६ रविवार

माळेगाव नगर पंचायतीच्या हलगर्जीपणाचा फटका ढगाई नगर वस्तीगृहातील नागरिकांना बसत असून येथे कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे.कचरा उचलण्यासाठी येणारी गाडी अनेक दिवसांपासून फिरकत नसल्याने नागरिकांच्या घरातच कचरा साचून राहतोय.परिणामी दुर्गंधी,डास आणि अस्वच्छतेमुळे परिसरात गंभीर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.स्थानिक नागरिकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत थेट नगरसेवकांनाच लक्ष्य केले आहे.“निवडणुकीच्या वेळी घराघरात येऊन हात जोडणारे नगरसेवक आता कुठे गेले?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.फक्त मतदान मागण्यासाठी येणारे लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर मात्र मूलभूत सुविधांकडे पूर्णपणे पाठ फिरवत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

दरम्यान ढगाई नगर परिसरात दररोज घरगुती कचरा साचत असून तो ठेवण्यासाठीही जागा उरत नाही.महिलांना घरात कचरा साठवून ठेवावा लागत आहे ज्यामुळे दुर्गंधी पसरते आणि लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.काही ठिकाणी कचरा घराबाहेर टाकण्याशिवाय पर्याय राहत नसल्याने परिसराची स्वच्छता पूर्णपणे ढासळली आहे.नागरिकांनी अनेक वेळा नगर पंचायतीकडे तक्रारी केल्या,फोन केले पण त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले असा आरोप करण्यात येतो.प्रशासनाकडून “उद्या येईल गाडी” अशी आश्वासने दिली जातात मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांचा संयम संपत चालला आहे.दरम्यान वाढत्या अस्वच्छतेमुळे डेंग्यू,मलेरिया, पोटाचे विकार यांसारख्या आजारांचा धोका वाढला असून आरोग्य यंत्रणेलाही याची दखल घ्यावी लागणार आहे.तरीही स्थानिक नगरसेवक किंवा संबंधित अधिकारी प्रत्यक्ष पाहणीसाठीही फिरकले नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की,नागरिकांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.“स्वच्छता नाही तर मतदान नाही” असा स्पष्ट संदेश देत पुढील निवडणुकीत याचा परिणाम दिसेल असा इशारा देण्यात आला आहे.ढगाई नगर वस्तीगृहातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न तातडीने सोडवला गेला नाही तर नागरिकांचा रोष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.नगरसेवकांनी केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष काम करून दाखवण्याची हीच वेळ असल्याचे नागरिकांचे मत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.