यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१४ मे २६ गुरुवार
पोलीसांना घरे बांधण्यासाठी सन २०२३ पासून प्रलंबित असलेले DG लोन (गृहकर्ज अग्रिम) अखेर १७६८.०८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून याबाबतचा शासन निर्णय दिनांक १२/०५/२०२६ रोजी देण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती देतांना पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी सांगितले की,पोलीसांना स्वतःचे हक्काचे घर बांधण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलातून सुमारे ४ ते ५ हजार पोलीस कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी यांनी सन २०२३ रोजी DG लोन घेण्यासाठी अर्ज दाखल केले होते परंतु दोन ते अडीच वर्षांचा कालावधी होऊनही DG लोन मंजूर करण्यात येत नव्हते.दरम्यान पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे व जिल्हाध्यक्ष यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाधिकारी,स्थानिक आमदार,पालकमंत्री यांचेमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस,तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री स्वअजितदादा पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदने देऊन सतत पाठपुरावा केला होता.तसेच डिसेंबर २०२५ मध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनात विधान भवनावर भव्य मोर्चा काढून गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची भेट घेऊन त्यांना देखील निवेदन दिले होते.त्यावेळेस पंकज भोयर यांनी राज्याच्या अप्पर गृहसचिव राधिका रस्तोगी यांच्यासोबत पोलीस बॉईज असोसिएशनच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली होती.परिणामी अखेर पोलीस बॉईज असोसिएशनच्या या आंदोलनाला यश आले असून महायुती सरकारने DG लोन मंजूर केले असून त्यासाठी १७६८.०८ कोटी रुपये इतका निधी मंजूर केला असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी दिली आहे.