सनी पटेल,पोलीस नायक
बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२२ एप्रिल २६ बुधवार
शहरातील तीन हत्ती चौक परिसरातील पूनावाला उद्यान समोरील रस्त्यावर रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.या ठिकाणी नगरपरिषदेचे सुरक्षारक्षक उपस्थित असतानाही वाहतूक नियमांचे उल्लंघन उघडपणे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार,सुरक्षारक्षक घटनास्थळी उभे असतात मात्र नियम तोडणाऱ्या वाहनांना थांबवण्याचा कोणताही ठोस प्रयत्न केला जात नाही.याबाबत विचारणा केली असता,“कोणीही ऐकत नाही,” असे उत्तर देत जबाबदारी झटकली जाते असा आरोप नागरिकांनी केला आहे.याचबरोबर वाहतूक पोलीस अधूनमधून येतात,फोटो काढतात आणि निघून जातात अशीही तक्रार आहे.त्यामुळे “हे कर्मचारी फक्त पगार घेण्यासाठीच काम करतात का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.विशेष म्हणजे या समस्येबाबत पोलीस प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही कारवाई फक्त दोन-तीन दिवसच का मर्यादित राहते असा प्रश्न उपस्थित होत आहे.काही दिवस कडक कारवाई होते मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती पूर्ववत होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
वाहतूक नियमांचे सतत उल्लंघन होत असल्याने अपघाताचा धोका वाढला असून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.या ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे,कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवणे किंवा कठोर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.आता प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत दीर्घकालीन उपाययोजना करावी अन्यथा एखादी गंभीर दुर्घटना घडल्याशिवाय यंत्रणा जागी होणार नाही का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.