Just another WordPress site

बारामतीत आंतरराज्य गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश !! ६३४ किलो गांजासह ३.०३ कोटींचा मुद्देमालासह सात आरोपी गजाआड !!

सनी पटेल,पोलीस नायक

बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.२२ मे २६ शुक्रवार

अमली पदार्थांविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरराज्य गांजा तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने केलेल्या या धाडसी कारवाईत तब्बल ६३४ किलो गांजा,दोन चारचाकी वाहने आणि इतर साहित्य असा एकूण ३ कोटी ३ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी काही संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.केंद्र सरकारच्या “नशामुक्त भारत अभियान” अंतर्गत पुणे ग्रामीण जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.त्याच अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अवैध अमली पदार्थांचा साठा,वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई सुरू आहे.

दरम्यान बारामती शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान जळोची परिसरातील एका शेतातून सुमारे ४७८.९५० किलो गांजा जप्त करण्यात आला होता.या मोठ्या साठ्याचा तपास सुरू असतांना पोलिसांना गांजा पुरवठ्यामागे आंतरराज्य स्तरावर कार्यरत असलेली टोळी असल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण,मोबाईल लोकेशन,गुप्त माहिती आणि स्थानिक नेटवर्कच्या आधारे तपासाची सूत्रे पुढे नेली.तपासादरम्यान काही संशयितांची नावे समोर आली व त्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी सापळे रचून आरोपींना ताब्यात घेतले.चौकशीत आरोपी छत्तीसगड राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजा खरेदी करून महाराष्ट्रात आणत असल्याचे उघड झाले आहे.पुढील तपासात आरोपी दोन इनोव्हा वाहनांमधून गांजाची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून संबंधित वाहनांवर कारवाई केली.एका कारमधून १३४ किलो गांजा जप्त करण्यात आला तर दुसऱ्या वाहनातून २३ किलो गांजा हस्तगत करण्यात आला.या दोन्ही कारवायांमुळे संपूर्ण तस्करी साखळी उघडकीस आली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर,सांगली,सातारा आणि पुणे जिल्ह्यातील अमली पदार्थ विक्रेत्यांना गांजा पुरवत असल्याचे निष्पन्न झाले आहे व यामुळे या टोळीचे जाळे राज्यातील अनेक भागांत पसरले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या कारवाईत एकूण ६३४ किलो गांजा,दोन चारचाकी वाहने आणि इतर साहित्य असा ३ कोटी ३ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अमली पदार्थ तस्करीविरोधातील ही पुणे ग्रामीण पोलिसांची आतापर्यंतच्या महत्त्वाच्या कारवायांपैकी एक मानली जात आहे.या प्रकरणी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून अटक आरोपींकडून आणखी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.गांजा पुरवठा साखळीतील इतर संबंधित व्यक्ती,आर्थिक व्यवहार आणि मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करीविरोधातील लढ्यात मोठे यश मिळाल्याचे मानले जात असून नागरिकांमध्येही समाधान व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.